• बेळगावच्या सीसीबी इन्स्पेक्टरसह सहा जणांचा मृत्यू
  • अथणी तालुक्यातील अरटाळ गावचे अरुण साळुंके यांचा दुर्दैवी अंत
  • बेंगळुरू पोलीस दलावर शोककळा

हरीद्वार : उत्तराखंडमधील जोशीमठजवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अरटाळ गावचे सुपुत्र आणि बेंगळुरू सीसीबी मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन डेहराडूनला परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

उत्तराखंडमधील जोशीमठ परिसरात मारवाडी पुलाच्या वरच्या बाजूला, जेपी पॉवर हाऊसजवळील टेकडीवर ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे खासगी हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथ धामहून डेहराडूनला परतत होते. प्रवासादरम्यान जोशीमठजवळ हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले, अशी माहिती चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार आणि UCADA चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक जैन यांनी दिली.

या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह बेंगळुरूचे पाच भाविक प्रवास करत होते. या दुर्घटनेत सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बेंगळुरू CCB मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरुण साळुंके, प्रताप, शंकर गौडा, सुधीर के. आणि एच. एस. नटराज यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) यांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

अरुण साळुंके हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अरटाळ गावचे रहिवासी होते. २००७ च्या बॅचचे अधिकारी असलेल्या साळुंके यांनी आपल्या पोलीस सेवेची सुरुवात दिल्लीतील इंटेलिजन्स विभागात निरीक्षक म्हणून केली होती. त्यानंतर कर्नाटकात परतल्यानंतर त्यांनी बेंगळुरू परिसरातील नेलमंगला, कुणिगल आणि बाणसवाडी पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली. सध्या ते बेंगळुरूच्या केंद्रीय गुन्हे शाखेत (CCB) कार्यरत होते.

अरुण साळुंके हे पत्नी आणि दोन मुलांसह बेंगळुरूमध्ये वास्तव्यास होते. त्यांचे वडील आणि भाऊ अरटाळ गावात राहतात. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली. कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या साळुंके यांच्या निधनाने बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.