बेळगाव : कोनेवाडी येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून भगवा ध्वज फडकविल्याच्या आरोपाशी संबंधित प्रकरणात ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह चौघांना बेळगाव येथील जेएमएफसी चौथ्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. सुनावणीस गैरहजर राहिल्याने जारी करण्यात आलेले त्यांचे वॉरंट बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर झाल्यानंतर रिकॉल करण्यात आले.

२१ जानेवारी २०२१ रोजी बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर कन्नड समर्थक संघटनांनी कन्नड ध्वज उभारला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेना नेते विजय देवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकविल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेमुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित न राहिल्याने विजय देवणे आणि अन्य संबंधितांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार विजय देवणे, संग्रामसिंग कुपेकर देसाई, सुनील शिंत्रे आणि संतोष मळवीकर हे बुधवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चौघांचेही वॉरंट रिकॉल करून त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

न्यायालयीन कामकाजानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय देवणे यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा गेल्या ७० वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा दिला आहे. कितीही अडचणी आल्या तरी मराठी जनतेच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात शामसुंदर पत्तार, हेमराज बेंचनावर, विशाल चौगुले आणि ज्योतिबा पाटील यांनी बचाव पक्षाच्या वतीने काम पाहिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर उपस्थित होते.