बेळगाव : कर्नाटक सरकारच्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित हॉकी स्पर्धेत बेळगावच्या एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागीय स्तरावरील स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला असून, शाळेच्या पाच विद्यार्थिनींची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी येथे विभागीय स्तरावरील हॉकी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची छाप पाडली. या संघातील जीया नवखंडकर, शरावती कारेकर, शमीका कारेकर, सावनी गोडबोले आणि चंदना दुंडी या पाच विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल शाळेत नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्राचार्या शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या खेळाडूंना बेळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, बेळगाव जिल्हा हॉकी असोसिएशन, सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, क्रीडा शिक्षक के. ए. हागीदळे, अनिल गोरे, पूजा लाड, प्राचार्या शोभा कुलकर्णी तसेच शिक्षकवर्ग आणि पालकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींच्या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.








