- आगामी निवडणुकांत भगवा फडकविण्याचा येळ्ळूर समितीचा निर्धार
येळ्ळूर : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी काळादिन कडकडीत आणि गांभीर्याने पाळण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच आगामी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी एकजुटीने तयारी करून विजयाचा भगवा फडकविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री बाल शिवाजी वाचनालय येथे विलास ना. घाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी गावातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्याध्यक्ष भुजंग पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांबाबत शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती श्री संभाजी उद्यान येथून निघणाऱ्या सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. काळादिन कडकडीत आणि गांभीर्याने पाळून मराठी भाषिकांची एकजूट दाखविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आगामी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर विभागात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. योग्य उमेदवारांची निवड करून त्यांच्या विजयासाठी तळागाळातून प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. निवडणुकांमध्ये समितीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्यात आला. मनोहर सी. पाटील यांनी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमधील आरक्षणाबाबत माहिती दिली.
सीमाभागातील मराठी भाषिकांची अस्मिता आणि हक्क जपण्यासाठी सर्वांनी आपापसांतील मतभेद आणि गटतट बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन ज्येष्ठ नेत्यांनी केले. सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ देण्यासाठी संघटनात्मक एकता कायम ठेवण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत शांताराम कुगजी, परशराम धाकोजी घाडी, रमेश ग. पाटील, लक्ष्मण छत्र्याण्णावर, दुर्गाप्पा ताशीलदार, हणमंत बा. पाटील, मनोहर घाडी आणि शुभम जाधव यांनी आपले विचार मांडले.
बैठकीला शिवाजी नांदुरकर, मनोहर आ. पाटील, एन. डी. पाटील, आनंद पाटील, मल्लाप्पा काकतीकर, गोपाळ शहापूरकर, चांगाप्पा कुगजी, तानाजी पाटील, राजू ऊघाडे, परशराम परीट, मनोहर म. पाटील, यल्लाप्पा बिर्जे, सिद्धार्थ पाटील, बापूसाहेब पाटील, मधु पाटील, संदीप पाटील, आकाश हलगेकर, रमेश गणपती पाटील, गोविंद बापूसाहेब पाटील, मनोज बेकवाडकर, सोमनाथ बाबले, पृथ्वीराज धामणेकर, अमित शहापूरकर, श्रीपती हुवन्नावर, अनंत पाटील, बाळकृष्ण पाटील, आनंद घाडी, मारुती यळगुकर, आनंद कृष्णा घाडी, शटूप्पा कांबळे, बाळकृष्ण अनंत पाटील आणि रवी शिवाजी धामणेकर आदी उपस्थित होते. शेवटी मनोहर घाडी यांनी आभार मानले.








