• प्रकल्पाची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यासह आवश्यक कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

बेळगाव : बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे (बुडा) अध्यक्ष आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी युवा नेते अमन सेठ आणि बुडा अधिकाऱ्यांसमवेत बेळगावमधील प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पाहणीदरम्यान आमदार सेठ यांनी प्रस्तावित जमिनीची माहिती घेतली. प्रकल्पाशी संबंधित आवश्यक प्रक्रिया नियमानुसार पूर्ण कराव्यात, भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

प्रस्तावित आयटी पार्क हा बेळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे आसिफ सेठ यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बुडाचे अध्यक्ष आणि आमदार या नात्याने शहराच्या भविष्यासाठी हा प्रकल्प यशस्वीपणे राबविणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नियमांचे पालन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव शहराचा दीर्घकालीन विकास आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे आणि प्रकल्पाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पुढे न्यावी, अशा सूचनाही आमदार आसिफ सेठ यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.