• माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी होतील व्यक्त केला विश्वास

बेंगळूरू : विधान परिषदेच्या सात जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसौधच्या पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या या गुप्त मतदान प्रक्रियेत माजी मंत्री आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला.

विधान परिषदेवरील सात सदस्यांच्या निवडीसाठी होत असलेल्या या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून, काँग्रेस पक्षाच्या पाचव्या उमेदवाराच्या विजयासाठी पक्षाने विशेष रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसच्या आमदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

यापूर्वी दोन दिवस एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक आणि विचारविनिमय सत्र आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही सहभाग घेतला होता. गुरुवारी सकाळी त्या बिदादी येथील रिसॉर्टमधून थेट विधानसौध येथे दाखल झाल्या आणि त्यांनी मतदान केले.

मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षातील सर्व आमदार एकसंघ असून पक्षाच्या रणनीतीनुसार मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या २२२ सदस्यांकडून विधान परिषदेवरील सात सदस्यांची निवड करण्यात येत असून, या निवडणुकीच्या निकालाकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.