• बेळगावच्या पाणीप्रश्नावर दोन मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार

बेळगाव : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या २० जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत दोन्ही राज्यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे बेळगाव शहराच्या पाणीटंचाईचा प्रश्नही या बैठकीत उपस्थित केला जाणार असून, महाराष्ट्र सरकारकडे दोन टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, यंदा मान्सूनने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नसल्यामुळे बेळगाव शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. काही ठिकाणी मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दोन टीएमसी पाणी मिळवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन पाणीप्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आगामी बैठकीकडे बेळगावकरांचे लक्ष लागले असून, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कोणता निर्णय होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.