- एक जण गंभीर जखमी
कागवाड : कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तीवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.
पहिला अपघात कागवाड – शेडबाळ मार्गावरील उप्पारवाडी परिसरात घडला. शेडबाळकडून कागवाडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरून जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारला मागील बाजूस जोरदार धडक बसली. या अपघातात मिरज तालुक्यातील सावळी येथील रहिवासी महानंदा सचिन चौगुले (वय ३८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेले त्यांचे पती सचिन चौगुले (वय ४४) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरी घटना मिरज-चिकोडी मार्गावरील शिरगुप्पी गावाजवळ घडली. विठ्ठल बसप्पा अक्कीमरडी (वय ५०, रा. निडगुंदी, ता. रायबाग) हे दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाची राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दोन्ही घटनांची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे. ए. सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








