- डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान ; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री
- नव्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्यातून सतीश जारकीहोळी यांचा समावेश
बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून राज्याचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी (दि. ३) बेंगळुरू येथील लोक भवनमध्ये पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर बारा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत नव्या सरकारमध्ये प्रवेश केला.
राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. तसेच बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांच्यासह के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, के. एच. मुनियाप्पा, रामलिंग रेड्डी, कृष्णा भैरगौडा, प्रियांक खरगे, यू. टी. खादर, ईश्वर खंड्रे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतींद्र सिद्धरामय्या, भैरती सुरेश आणि डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
या बहुप्रतीक्षित शपथविधी सोहळ्यासाठी राजधानीत विशेष तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
नव्या सरकारच्या स्थापनेमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळातील प्रशासन आणि विकासकामांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








