- डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची तर १० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणातील सत्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून डी. के. शिवकुमार उद्या, बुधवार दि. २ जून रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातील पहिल्या टप्प्यात सुमारे १० आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजभवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
नवीन मंत्रिमंडळात अनुभवी आणि तरुण नेतृत्वाचा समतोल साधण्यावर भर देण्यात आला असून संभाव्य मंत्र्यांच्या यादीत जी. परमेश्वर, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी आणि कृष्णा बैरेगौडा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय प्रियांक खर्गे, यू. टी. खादर, यतींद्र सिद्धरामय्या आणि रूपा शशीधर यांनाही मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ रचनेबाबत पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर चर्चा पूर्ण झाली असून आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. नव्या मंत्रिमंडळात प्रादेशिक प्रतिनिधित्वासोबतच सामाजिक संतुलन राखण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारची पहिली मंत्रिमंडळ रचना राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.







