बेंगळुरू : कर्नाटकातील सत्तांतराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून, विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर नव्या सत्तासमीकरणात चार उपमुख्यमंत्री नेमण्याचा नवा फॉर्म्युलाही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक आणि राजकीय समतोल साधण्यासाठी मागासवर्गीय, ओबीसी, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातील प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा विचार सुरू आहे. संभाव्य नावांमध्ये दलित समाजातून जी. परमेश्वर आणि प्रियांक खर्गे, ओबीसी गटातून यतींद्र सिद्धरामय्या, लिंगायत समाजातून एम. बी. पाटील आणि ईश्वर खांड्रे, तर अल्पसंख्याक समाजातून के. जे. जॉर्ज, यू. टी. खादर आणि जमीर अहमद खान यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नेतृत्वबदलाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात गुरुवारी सकाळी महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही बैठक बेंगळुरूमधील मुख्यमंत्री निवासस्थान ‘कावेरी’ येथे पार पडणार असून, त्यानंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्येही दोन्ही नेत्यांमध्ये ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ चर्चेची बैठक झाली होती. त्यावेळी सत्तावाटप आणि नेतृत्व बदलाच्या चर्चांदरम्यान काँग्रेस नेतृत्वाने एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे, जेणेकरून डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देता येईल. त्याचबरोबर सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय पातळीवर भूमिका आणि त्यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.