• कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची विशेष तयारी

बेळगाव : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी बुधवारी बाजारपेठ परिसरात व्यापक पथसंचलन केले.

सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुरक्षितता कायम राहावी, या उद्देशाने हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनात पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

हे पथसंचलन खडेबाजार, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली आदी प्रमुख मार्गांवरून काढण्यात आले. पोलिसांच्या या हालचालीमुळे बाजारपेठ परिसरात सुरक्षा व्यवस्थेची जाणीव अधिक ठळकपणे दिसून आली.

यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. “बकरी ईदसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. सर्व धर्मीय समाजांच्या भावना जपत सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनीही परस्पर सहकार्य, सहिष्णुता आणि शांतता राखावी,” असे त्यांनी सांगितले.