- पिकांचे मोठे नुकसान ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
खानापूर : तालुक्यातील वरकडे आणि पाटये परिसरात गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या सततच्या वावरामुळे शेतात जाणे तसेच लोंढा बाजारपेठेकडे प्रवास करणेही नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे.
वरकडे आणि पाटये भागात ठाण मांडून बसलेल्या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. पाटये गावातील उसाचे पीक उद्ध्वस्त केल्यानंतर आता या हत्तींच्या कळपाने वरकडे गावातील सर्व्हे क्रमांक ५० मधील शेतांकडे मोर्चा वळवला आहे.
हत्तींकडून सुपारी आणि नारळाची झाडे मुळासकट उखडून टाकण्यात येत असून, केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले असून त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
दरम्यान, लोंढा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मात्र, केवळ पाहणी न करता वन विभागाने तातडीने मोहीम राबवून जंगली हत्तींना मानवी वस्तीपासून दूर जंगलात हाकलून लावावे, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.








