बेळगाव : टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटचे एका बाजूचे लोखंडी गेट अचानक तुटून पडल्याने सोमवारी सकाळी काही काळ वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने त्यावेळी परिसरात तुरळक रहदारी असल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठ बाजूचे रेल्वे गेट अचानक कोसळले. गेट तुटून पडताच दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत आपली वाहने जागेवरच थांबवली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पहिले रेल्वे गेट तात्पुरते बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळवली. त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी रेल्वे गेट अशा प्रकारे तुटून पडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भविष्यात अशा धोकादायक घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गेटची नियमित तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








