येळ्ळूर ता. ४ : उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदी, बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे. अशोक नाईक यांची निवड झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ व श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात नूतन प्रांतपाल अशोक नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर हे होते. तर व्यासपीठावर साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा.सी. एम. गोरल, सचिव डॉ. तानाजी पावले, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, सदस्य सुभाष मजुकर, बळीराम देसुरकर उपस्थित होते.

विद्यार्थीनीच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी नूतन प्रांतपाल अशोक नाईक यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांच्या शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीची माहिती विद्यार्थ्यांना दिली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना प्रांतपाल अशोक नाईक म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या पदासाठी माझी निवड झाली असून या पदाला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. समाजातील वंचित, शोषित व आर्थिक दुर्बल असलेल्या घटकांना रोटरी क्लबच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आतापर्यंत रोटरीच्या माध्यमातून भरपूर सामाजिक कार्य केले आहे. त्यापेक्षाही जास्त कार्य करण्याची, संधी या पदाने पुन्हा मला उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने करण्याचे काम मी करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही केलेला हा सत्कार मला पुन्हा कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यावेळी मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांनीही प्रांतपाल अशोक नाईक यांच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षक संजय मजुकर, एस. एच. लोकळूचे, विद्या पाटील, रेखा पाटील, निर्मला कंग्राळकर, ज्योती बुवा यांच्यासह शाळेचे सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शेवटी शिक्षक संजय मजुकर यांनी आभार मानले.