- खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांचे प्रतिपादन
- म. ए. युवा समितीतर्फे हलशी विभागातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण
खानापूर / प्रतिनिधी
भाषा टिकली तर संस्कृती टिकते त्यामुळे मराठी शाळा वाचविण्यासाठी पालक आणि मराठी भाषिकानी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यात शैक्षणिक साहित्य वितरणाचा शुभारंभ गुरुवारी हलशी येथील सरकारी मराठी शाळा येथे करण्यात आला. प्रारंभी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूर तालुका अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, समितीचे पदाधिकारी राजाराम देसाई, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नरशिंग घाडी यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना देसाई यांनी सीमाभागात जाणीवपूर्वक कन्नड सक्ती वाढविली जात आहे. मात्र मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारच्या सक्तीला कधीच भीक घातली नाही. भाषा टिकली तर संस्कृती टिकते त्यामुळे सीमाभागात मराठी शाळा वाचविण्यासाठी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात पुढे आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी मराठीतून शिक्षण घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
अमृत शेलार यांनी युवा समितीतर्फे मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न स्तुत्य असून प्रत्येक गावातील मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी शाळा सुधारणा कमिटी व शिक्षकांनी प्रयत्न करावेत. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत आहे याचाही विद्यार्थ्यांनी लाभ करून घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे वर्षभर हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देत युवा समितीच्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. पाटील यांनी स्वागत तर सहशिक्षिका पी. एस. माळवी यांनी आभार मानले. यावेळी सह शिक्षिका जी. व्ही. भाले, एम. जे. हजारे, जी. एन. घाडी, विशाल गुरव आदी उपस्थित होते.
हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये हलशीवाडी व गुंडपी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रारंभी माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई, गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनोद देसाई, निवृत्त शिक्षक नारायण देसाई, हलशी कृषी पत्तीन सोसायटीचे माजी चेअरमन सुधीर देसाई यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत देसाई यांनी गेल्या आठ वर्षांपासून युवा समिती विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी सर्वांनी मदत करीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी मदत करूया असे मत व्यक्त केले. शाळेचे सहशिक्षक कृष्णाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी परसराम देसाई, सह शिक्षक आदी उपस्थित होते.