- निसर्गप्रेमींसाठी ठरतोय आकर्षण ; धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
चंदगड : पश्चिम घाट प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील धबधबे निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहेत. याचप्रमाणे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेलगत निसर्गाच्या कुशीत असलेला किटवाड धबधबा सध्या पर्यटकांना खुणावत आहे.
हा धबधबा बेळगाव जिल्ह्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे. कठीण खडकाळ दरडींमधून दुधाच्या प्रवाहाप्रमाणे खाली कोसळणाऱ्या या मनोहारी दृश्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे.
युवक-युवती धबधब्यासमोर उभे राहून सेल्फी काढत, नाचत-बागडत आनंद साजरा करत आहेत. केवळ बेळगावच नव्हे, तर गोवा, महाराष्ट्र आणि राज्याच्या विविध भागांतून पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे भेट देत आहेत. महाराष्ट्रामधून बेळगाव जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येणारे पर्यटकही सीमेवरील किटवाड धबधब्याला भेट देऊन इथल्या सौंदर्यावर मोहित झाले आहेत, असे पाहायला मिळत आहे.