- थकबाकी वसुलीवर महापालिकेचा भर
बेळगाव : शहरातील एक लाख रुपयांहून अधिक घरपट्टी थकीत असलेल्या मिळकतधारकांची यादी महानगरपालिकेच्या महसूल विभागाने तयार केली आहे. संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावून कर वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या थकबाकीदारांकडून सुमारे २० कोटी रुपयांची घरपट्टी वसूल होणे बाकी असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
गतवर्षी महानगरपालिकेला महसूल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करता आले नव्हते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी १०३ कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५४ कोटी रुपयांहून अधिक महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
मध्यंतरी एसआयआरच्या कामामुळे घरपट्टी वसुलीच्या प्रक्रियेकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी महसूल विभागाला घरपट्टी वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महसूल विभागाने थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे.
पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपेक्षा अधिक कर थकीत असलेल्या मिळकतधारकांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर ५० हजार रुपयांपर्यंत कर थकीत असलेल्या मिळकतधारकांकडूनही नोटिसा बजावून थकबाकी वसूल केली जाणार आहे.
एक लाख रुपयांहून अधिक कर थकीत असलेल्या मिळकतधारकांनी आपली थकबाकी भरल्यास महापालिकेच्या तिजोरीत सुमारे २० कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ शकतो, अशी माहिती महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी दिली.








