- ‘टीचर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान
बेळगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन प्रेरणादायी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. अध्यापनातील समर्पण, संयम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘टीचर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उर्दू माध्यमासाठी श्रीमती वजीदा भानू, मराठी माध्यमासाठी श्री. तुषार कांबळे आणि इंग्रजी माध्यमासाठी श्री. विलास कार्येनावर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी या शिक्षकांनी केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
हा पुरस्कार रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी, सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. अनुपमा कल्लोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ. स्मिता आणि रोटेरियन सविता वेसणे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
शिक्षक हा केवळ धडे शिकविणारा नसतो, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. अशा शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून शिक्षकी पेशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.








