• अवघ्या ७-८ इंच पाण्यात विसर्जन
  • महापालिकेच्या नियोजनावर भाविकांचा संताप

बेळगाव : गोकुळाष्टमीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही जपली जाते. रात्री बारा वाजता पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नदी, तलाव किंवा कुंडात मूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र, बेळगावातील कपिलेश्वर तलावात यंदा विसर्जनासाठी पुरेसे पाणीच उपलब्ध नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली.

बेळगाव शहरात नदी नसल्याने दरवर्षी गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन कपिलेश्वर तलावात केले जाते. याठिकाणी विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा तलावातील पाण्याची पातळी एक फुटापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना नाईलाजाने अवघ्या ७–८ इंच पाण्यात गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन करावे लागले.

  • महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना निर्माण झालेली अडचण पाहून उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. धार्मिक परंपरेनुसार होणाऱ्या विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था आधीच का करण्यात आली नाही, असा सवाल भाविकांकडून उपस्थित करण्यात आला.

महापालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील नगरसेवकांना या समस्येची पूर्वकल्पना असूनही वेळीच उपाययोजना का करण्यात आली नाही, अशी चर्चा भाविकांमध्ये सुरू होती.

परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, रामराज दरवंदकर आणि माजी नगरसेवक राजू बिरजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

गोकुळाष्टमीसारख्या पारंपरिक धार्मिक उत्सवासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असताना, मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था न होणे ही महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले.

भविष्यात अशा धार्मिक उत्सवांच्या वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने आवश्यक सुविधा आणि योग्य नियोजन वेळेत करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.