- पत्नी , प्रियकरासह नऊ जण अटकेत
बेळगाव : जिल्ह्यात विम्याच्या रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माजी सैनिकाचा पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने विषप्रयोग करून खून केल्याचा आरोप असून, या प्रकरणात पुरावे दडपण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार, निवृत्त सैनिक संदीप मंजरगी (वय ४६) हे किरकोळ रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. पुढील उपचारांसाठी त्यांना घटप्रभा येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले होते.
तपासादरम्यान, संदीप मंजरगी यांची पत्नी सुमा आणि तिचा कथित प्रियकर पुंडलिक यांनी संगनमत करून त्यांना झोपेच्या गोळ्या देत सलाईनद्वारे विषप्रयोग केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेनंतर मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलीस तपासात शवविच्छेदन आणि रासायनिक विश्लेषणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात काही व्यक्तींनी आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून पुरावे दडपण्यास मदत केल्याचा आरोप असून, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी सुमा, पुंडलिक यांच्यासह अप्पासाहेब नाईकवाडी, चन्नप्पा अडविस्वामी मठ, नागराजू, अशोक गुजनाल, बसवराज बसम्मा आणि राहुल जोगी यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, प्रकरणातील इतर पैलूंचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, विम्याच्या रकमेच्या वाटपावरून आरोपींमध्ये झालेल्या वादातून या गुन्ह्याची माहिती समोर आल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या यमकनमर्डी आणि घटप्रभा पोलीस पथकाच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.








