- एपीएमसीकडून कृषी विपणन विभागाकडे विशेष जाहिरातीचा प्रस्ताव
- अर्ज न करणाऱ्यांना हटविण्याची अट
बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) रविवार बाजारात सध्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या व्यापाऱ्यांना एपीएमसी परिसरातील रिक्त गाळे, दुकाने आणि गोदामे वाटप करण्यासाठी विशेष जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव कृषी विपणन विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
जय किसान व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या खासगी भाजीपाला बाजाराचा परवाना सप्टेंबर २०२५ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार एपीएमसीच्या रविवार बाजारात तात्पुरती जागा देण्यात आली होती. १ ऑक्टोबर २०२५ पासून हे व्यापारी रविवार बाजारात व्यवसाय करत असून सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी त्यांना शुल्कामध्येही सवलत देण्यात आली होती.
मात्र, एपीएमसीने सादर केलेल्या अहवालात रविवार बाजाराची संकल्पना ही शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यापाऱ्यांचा कायमस्वरूपी व्यवसाय सुरू ठेवणे बाजाराच्या उद्देशाशी सुसंगत नसल्याचे समितीचे मत आहे.
एपीएमसी परिसरातील रिक्त गाळे आणि इतर जागांच्या वाटपासाठी यापूर्वी दोन वेळा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार आता विशेष जाहिरात प्रसिद्ध करून केवळ जय किसान खासगी बाजारातील व्यापाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच या प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांना रविवार बाजारातील जागा रिकामी करण्यास सांगितले जाऊ शकते, अशी अटही प्रस्तावित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेमुळे रविवार बाजाराचा मूळ उद्देश कायम ठेवत तो पुन्हा शेतकरी-केंद्रित करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याची चर्चा व्यापारी आणि शेतकरी वर्गात सुरू आहे.







