बेळगाव : वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भावी पिढीला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जी.एस.एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे यांनी केले.

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रातर्फे आयोजित ज्ञान आणि मनोरंजन कार्यक्रमात ते ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते.

यावेळी दिल्ली येथील एम्स वैद्यकीय महाविद्यालयाचे शल्यविशारद डॉ. मंजुनाथ पोळ, सोसायटीचे उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई आणि सहकार्यवाह शिवराज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. मेणसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वाढते शहरीकरण आणि निसर्गावरील अतिक्रमणामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया कमी होत आहे. भूगर्भातील पाणीसाठे टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच पाण्याच्या व्यावसायिकीकरणाचा विषय गंभीर बनत असून या क्षेत्रातील वाढती गुंतवणूक भविष्यात मोठे संकट निर्माण करू शकते, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी पाणी संवर्धनाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. मंजुनाथ पोळ यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि मधुमेहावरील शस्त्रक्रियांसंदर्भात सविस्तर माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमात रविंद्रनाथ जुवळी आणि सुरेंद्र देसाई यांनी हिंदी गीते सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. प्रारंभी अरुण धोत्रे यांनी प्रार्थना सादर केली. सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर विठ्ठल पोळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विजय वाईगडे यांनी आभार मानले.