बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आणि भाषिक अल्पसंख्याक हक्कांच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा तसेच जनजागृती करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि. १४) दुपारी २ वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.

समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, सीमाभागातील सार्वजनिक ठिकाणे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवरील फलकांमध्ये कन्नड भाषेचा वापर वाढत असल्याने मराठी भाषिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक म्हणून मिळणारे अधिकार प्रभावीपणे लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कर्नाटक सरकारचे लक्ष या प्रश्नांकडे वेधण्याचा समितीचा मानस आहे. मराठी भाषिकांना त्यांचे घटनात्मक आणि भाषिक हक्क मिळावेत, यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

मोर्चाच्या नियोजनासाठी होणाऱ्या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेणे, प्रचार आणि जनजागृतीचा आराखडा ठरविणे तसेच पुढील कार्यक्रमांवर चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीस बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, विविध घटक समित्यांचे सदस्य, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील आणि मोनप्पा पाटील यांनी केले आहे.