बेळगाव : शहरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांमध्ये सुरक्षित वाहनचालकतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष ‘हेल्मेट जनजागृती सप्ताह’ सुरू केला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

राणी चन्नम्मा चौक येथे उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन तसेच जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात वाहनचालकांना वाहतूक सुरक्षेसंदर्भातील माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना संदीप पाटील यांनी सांगितले की, उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी दोन हजारांहून अधिक प्राणघातक अपघातांची नोंद झाली आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही, तर नागरिकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवडाभर हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. या काळात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्यांना इंधन न देण्याबाबत पेट्रोल पंप चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ८०० ते ८५० जणांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होतो, तर सुमारे तीन हजार नागरिक जखमी होतात. वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या मोहिमेअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः हेल्मेट परिधान करून वाहन चालवत नागरिकांना सुरक्षित वाहनचालकतेचा संदेश दिला. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक बाब असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.