• १४ व १७ वर्षांखालील गटांत दक्षिण मध्य क्षेत्राचे विजेतेपद
  • १९ वर्षांखालील गटात पश्चिम उत्तर प्रदेश अव्वल

बेळगाव : विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्य क्षेत्राच्या प्रायोजकत्वाखाली, विद्याभारती बेळगाव जिल्हा आणि संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल, अनगोळ यांच्या संयुक्त आयोजनात झालेल्या ३७ व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राने दोन गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकाविला. १९ वर्षांखालील गटात पश्चिम उत्तर प्रदेश संघाने विजेतेपद मिळविले.

१४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात दक्षिण मध्य क्षेत्राने पश्चिम उत्तर प्रदेश संघाचा १-० असा पराभव केला. दक्षिण मध्य क्षेत्राच्या मुक्ता हिने निर्णायक गोल नोंदविला. १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यातही दक्षिण मध्य क्षेत्राने उत्तर क्षेत्रावर १-० अशी मात केली. या सामन्यात समीक्षा खन्नुरकर हिने विजयी गोल केला.

१९ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात पश्चिम उत्तर प्रदेश संघाने उत्तर क्षेत्राचा २-० असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजयी संघाकडून भूमिका हिने गोल नोंदविला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बेळगावच्या महापौर प्रीती कामकर आणि पोलीस उपआयुक्त नारायण बरमनी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी क्रीडा भारतीचे राज्य सचिव अशोक शिंत्रे, पूर्वोत्तर क्षेत्राचे निरीक्षक सुबोध बोराह, राजस्थानचे कमलेश शर्मा, विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, राघवेंद्र कागवाड, राज्य क्रीडा प्रमुख देवेंद्रजी, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी आणि ऋतुजा जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी विद्याभारतीचे जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार, जयसिंग धनाजी, बापू देसाई, हर्ष रेडेकर, उमेश मजुकर, बसवत पाटील, सुनील तगारे, मानस नायक यांच्यासह विविध क्षेत्रांतील क्रीडाशिक्षक आणि आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. किरण पावसकर यांनी सूत्रसंचालन केले, तर धनश्री पाटील आणि सविता पाटणकर यांनी आभार मानले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.