• ऐतिहासिक कामगिरीसह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता

बेळगाव : विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अणगोळ येथील सेंट मीरा इंग्लिश स्कूलने चारही गटांत विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दैदिप्यमान यशामुळे शाळेच्या सर्व संघांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

टिळकवाडी येथील लेले मैदानावर सेंट मीरा शाळेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत प्राथमिक आणि हायस्कूल अशा मुला-मुलींच्या चारही गटांमध्ये सेंट मीरा संघांनी वर्चस्व गाजवले.

प्राथमिक मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट मीरा संघाने भातकांडे शाळेचा पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ असा पराभव केला. प्राथमिक मुलांच्या गटातही सेंट मीरा संघाने विजेतेपदावर नाव कोरले.

हायस्कूल मुलांच्या अंतिम सामन्यात खानापूरच्या शांतिनिकेतन संघाचा २-० असा पराभव करत सेंट मीराने अजिंक्यपद पटकावले. तर हायस्कूल मुलींच्या गटात भातकांडे शाळेवर २-० अशी मात करत चौथे विजेतेपदही आपल्या नावावर केले.