• भाजपला दोन जागांवर यश

बेंगळुरू : राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून सत्ताधारी काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. भाजप आणि जेडीएसमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील क्रॉस-व्होटिंगचा फटका बसत जेडीएसला मोठा पराभव सहन करावा लागला, तर काँग्रेसचे पाचही उमेदवार विजयी झाले.

एकूण सात जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने पाच, तर भाजपने दोन जागा जिंकल्या. निकालांमध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी दिसून आल्या. विरोधी गोटातील क्रॉस-व्होटिंग हे या निकालांचे प्रमुख कारण ठरले. एकूण २२२ मतांपैकी एका मतपत्रिकेत चुकीचा क्रमांक लिहिल्यामुळे एक मत अवैध ठरले.

काँग्रेसच्या उमेदवारांनी चुरशीच्या लढतीत आघाडी घेत विजय मिळवला. बी.के. हरिप्रसाद, थिप्पनप्पा कामकानूर आणि बी.एस. शिवण्णा या तिघांना प्रत्येकी ३० मते मिळाली. पी.व्ही. मोहन यांनी २९ मते मिळवत विजय निश्चित केला, तर पाचवे उमेदवार विनय कार्तिक यांनी ३२ मते मिळवत सहज यश मिळवले.

दुसरीकडे, जेडीएससाठी हा निकाल धक्कादायक ठरला. बीसी प्रवर्गातील क्रॉस-व्होटिंगमुळे जेडीएसचे एकमेव उमेदवार गोविंदराजू यांना केवळ १४ मते मिळाली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा ११ मते अधिक मिळाल्याचे स्पष्ट झाले असून भाजपच्या चार आणि जेडीएसच्या सात आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान २७.६३ मतांचा कोटा आवश्यक होता.

भाजपचे उमेदवार आर. रघु यांनी २९ मते मिळवत थेट विजय मिळवला, तर दुसरे उमेदवार लिंगराजू पाटील यांना २७ मते मिळाली. मात्र कोटा पूर्ण न झाल्यामुळे निकाल प्रक्रियेत एलिमिनेशन राऊंडचा आधार घेण्यात आला आणि अंतिम टप्प्यात लिंगराजू पाटील यांचा विजय निश्चित झाला.