• केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर अहोरात्र आंदोलनाचा इशारा

बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, एमएसपी ३१ रुपयांवरून ६० रुपये करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. बुधवारपासून सुरू झालेली पदयात्रा गुरुवारी बेळगावात दाखल झाली असून, शुक्रवारी सुवर्णसौध येथून कित्तूरमार्गे हुबळीकडे रवाना झाली. हुबळीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर अहोरात्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी तब्बल ३१ तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. मात्र, आंदोलनानंतरही मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी आता पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्धार केला आहे. महामार्गावरील आंदोलनानंतर थेट केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

उसाला योग्य दर मिळण्याबरोबरच एमएसपी ३१ रुपयांवरून ६० रुपये करण्याची आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बेळगावातून हुबळीकडे निघालेल्या या पदयात्रेमुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.