• बेळगाव जिल्ह्यात प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित
  • ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांमध्ये एकमत
  • कारखाने सुरू करण्याचा निर्णय

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील दर निश्चितीच्या वादावर अखेर तात्पुरता तोडगा निघाला आहे. बेळगाव जिल्ह्यात उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याचे साखर कारखानदारांनी मान्य केले आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पावसावर अवलंबून ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी या दराला सहमती दर्शवली आहे. विविध शेतकरी संघटनांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सर्वांचे एकमत झाल्याने साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चुनाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना ‘जेल भरो’ आंदोलन आणि पदयात्रा थांबवून साखर कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

राज्य सरकारच्या एसएपी (SAP) दराच्या मागणीबाबत एका वर्षानंतर आढावा घेण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगण्यात आले. प्रतिटन ३,६०० रुपयांचा निश्चित केलेला दर केवळ बेळगाव जिल्ह्यापुरताच मर्यादित असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.