- बेळगाव ते हुबळी पदयात्रा
- कर्जमाफी आणि ऊस दरवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र
बेळगाव : कर्जमाफी, ऊस दरवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या राज्य रयत संघटनेच्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील धरणे आंदोलन मागे घेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळविला. केंद्र सरकारने मागण्या मान्य करण्यासाठी दिलेल्या मुदतीत सकारात्मक निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांनी बेळगाव ते हुबळी अशी पदयात्रा काढत मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला.
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेकपोस्ट, हत्तरगी आणि हिरेबागेवाडी टोलनाक्यांवर सुरू असलेले अहोरात्र धरणे आणि रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांनी तात्पुरते मागे घेतले. त्यानंतर हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोलनाक्यावरील सत्याग्रहही सोडून हजारो शेतकरी हुबळीकडे रवाना झाले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाला घेराव घालून आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता.
कर्जमाफी, ऊस दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला बुधवार संध्याकाळपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाची दिशा बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
“न्याय मागण्यासाठी आम्ही मंत्र्यांच्या दारी जात आहोत. तिथेच आम्हाला न्याय मिळेल,” अशी भूमिका रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
महामार्गावरील धरणे आंदोलन मागे घेतल्याने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, शेतकऱ्यांनी हुबळीकडे मोर्चा वळविल्याने आंदोलनाबाबतची उत्सुकता कायम होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे आता शेतकरी संघटनांचे लक्ष लागले आहे.








