• शुद्ध पाणी दूषित, ऐन ऑक्टोबरमध्ये पाणीटंचाई

बेळगाव : आरपीडी, टिळकवाडी, भाग्यनगर परिसरात ड्रेनेजचे पाणी विहिरींमध्ये शिरल्यामुळे विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. मागील काही वर्षांपासून आरपीडी, भाग्यनगर परिसरामध्ये ड्रेनेज तुंबणे आणि सांडपाणी विहिरींमध्ये मिसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आता ऑक्टोबर महिना सुरू असून या परिसरातील ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी थेट जमिनीत मुरून परिसरातील शुद्ध पाण्याच्या विहिरींमध्ये मिसळले आहे. त्यामुळे ऐन ऑक्टोबर महिन्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मागील काही वर्षांपासून आरपीडी परिसरातील ड्रेनेजची समस्या गंभीर बनली आहे. मुख्य आरपीडी चौकात ड्रेनेजचे पाणी सदैव वाहत असते. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचारी आणि वाहनचालकांना दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाण्यातून वाट काढावी लागते. तसेच, सध्या आजूबाजूच्या परिसरातील ड्रेनेजही पूर्णपणे तुंबल्यामुळे सांडपाणी थेट विहिरींमध्ये मिसळत असून शुद्ध पाणी दूषित झाले आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हीच परिस्थिती पुन्हा पुन्हा ओढवत आहे. या तक्रारीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.

सदर ड्रेनेज पाईपलाईन जुन्या आणि लहान आकाराच्या झाल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट, व्यावसायिक आस्थापने आणि रहिवासी वाढल्यामुळे सध्याच्या पाईपलाईन अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ड्रेनेज पाईपलाईनची नव्याने पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे.

जर यावर वेळीच लक्ष दिले नाही, तर पाऊस नसल्याने आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना दूषित विहिरींमुळे अधिकचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन सदर परिसरातील व्यवस्था सुधारावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.