• पर्यावरणीय आरोपांवर आक्षेप
  • कारखान्याचे कामकाज अबाधित ठेवण्याची प्रशासनाकडे मागणी

बेळगाव : कागवाड तालुक्यातील उगार साखर कारखान्याविरोधात करण्यात येत असलेल्या कथित पर्यावरणीय आरोपांच्या निषेधार्थ शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. कारखान्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली.

उगार साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, कामगार आणि परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेचा विचार करून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. कारखान्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्या दूर करण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात; मात्र कोणत्याही कारणामुळे कारखान्याचे कामकाज ठप्प होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कारखान्याला अडचणी निर्माण झाल्यास त्याचा थेट फटका शेतकरी, कामगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसेल, असे सांगत प्रफुल्ल थोरुशे यांनी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

या आंदोलनात उगार साखर कारखान्याचे मोठ्या संख्येने कामगार, शेतकरी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.