- भूसंपादनाला योग्य मोबदला ; सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची मागणी
चिक्कोडी : राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी चिक्कोडीत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
शहरातील बसवेश्वर सर्कल येथे मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर बैलगाड्यांची रांग लावत वाहतूक रोखली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी नेत्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. संघटनेचे मानद अध्यक्ष शशिकांत गुरुजी, अध्यक्ष चन्नप्पा पुजेरी, उपाध्यक्ष सत्यप्पा मल्लापुरे, चिक्कोडी संपदन स्वामीजी तसेच चिंचणीचे शिवप्रसाद देवा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला आणि सिंचन सुविधांचा विस्तार झाल्यासच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा ठाम सूर आंदोलनादरम्यान उमटला. सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला.








