बिजगर्णी : पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलच्या क्रीडांगणावर बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी ९ वाजता संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धांचे उद्घाटन होणार असून, बाळू देसूरकर यांच्या हस्ते स्पर्धांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभात वाय. पी. नाईक आणि अशोक कांबळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. दीपप्रज्वलन बाळकृष्ण तेरसे, पुंडलिक चव्हाण, अशोक गावडा, रेहमान तहसीलदार, पुंडलिक जाधव, गीतेश ठाणब आणि के. आर. कुन्नूरकर यांच्या हस्ते होणार आहे. ध्वजारोहण सचिन बाळेकुंद्री यांच्या हस्ते होईल, तर क्रीडाज्योतीचे स्वागत मनोहर बेळगावकर करतील. साहित्य पूजन उत्तम मोरे, फाईल वितरण ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक व उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते, तर बक्षीस पूजन मनोहर मोरे यांच्या हस्ते होणार आहे. गावातील ब्रम्हलिंग सोसायटीतर्फे क्रीडा शिक्षकांना ब्लेझर प्रदान करण्यात येणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रमेश कांबळे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर मुला-मुलींसाठी वैयक्तिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होईल. धावणे, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, १००, २००, ४००, ५००, ८००, १५००, ३००० मीटर धावणे, ५००० मीटर चालणे तसेच रिले आणि अडथळा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १ ऑगस्ट रोजी बुद्धिबळाच्या इनडोअर स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर सोमवार, ३ ऑगस्ट रोजी १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉल या सांघिक स्पर्धा होतील. मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी मुलांच्या सांघिक स्पर्धा पार पडणार असून, त्याच दिवशी विजेत्या खेळाडू व संघांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
यंदापासून बेळगुंदी आणि हिंडलगा क्लस्टरचे एकत्रीकरण करून बेळगुंदी झोनची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी १७ माध्यमिक शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








