बेळगाव / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य ऑलिम्पिक संघटना आणि युवा सक्षमीकरण क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात मोठ्या उत्साहात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उत्तरचे आमदार आसिफ सेठ, मुख्यमंत्र्यांचे माजी राजकीय सचिव के. गोविंदराजू, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद आणि इतर मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना, मुख्यमंत्र्यांचे माजी राजकीय सचिव के. गोविंदराजू यांनी आज जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये मॅरेथॉन आयोजित करून यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

तर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, ऑलिम्पिक दिन हा प्रत्येकामध्ये नेतृत्वगुण आणि सक्रिय क्रीडा भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. पावसातही ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनमध्ये बेळगावच्या लोकांनी उत्साही सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.