बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना वर्षभरापूर्वी समितीच्या कार्यालयाबाहेर घडलेल्या घटनेशी संबंधित प्रकरणात खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पोलिसांनी शुभम शेळके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे हे खडेबाजार पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

वैद्यकीय तपासणीनंतर गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजता दोघांना न्यायमूर्ती एच. एस. मंजुनाथ यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या कारवाईनंतर बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या घटनेची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू असून, प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.