- २२६ तालुके दुष्काळग्रस्त
बेंगळुरू : कर्नाटकातील २४० पैकी २२६ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. पावसाअभावी ८२ टक्के पीक वाया गेले असून, यामुळे सुमारे ६० हजार ते ७० हजार कोटी रुपयांच्या पीक नुकसानीचा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. (एनडीआरएफ) निकषांनुसार केंद्राकडे ७,१४२.६४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली. तर त्याआधी सुरुवातीला त्यांनी ३७०५.३० कोटी रुपयांची दुष्काळी मदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आणखी तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे अतिरिक्त मदतीची मागणी करणारे निवेदन आता कर्नाटक सरकार केंद्राला सादर करणार आहे. केंद्र सरकारने मदत निधी वितरित करावा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. या निधीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि इतरांना दिलासा मिळेल. कर्नाटकात दुष्काळामुळे धान्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली होती.








