- रमाकांत आणि चंद्रकांत कोंडुसकर कुटुंबीयांचा सामाजिक उपक्रम
बेळगाव : नागरिकांना अडचणीच्या काळात तातडीची मदत मिळावी, या उद्देशाने श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने सर्वसामान्यांच्या सेवेसाठी दुसरी शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली. शिवबसवनगर येथील कारंजीमठ-ज्योतिबा मंदिर परिसरात सोमवारी या शववाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ही शववाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे.
परमपूज्य गुरू चंद्रशेखर महाराज यांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने लोकार्पण कार्यक्रम पार पडला. एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्यानंतर पार्थिव रुग्णालयातून इच्छित स्थळी नेण्यासाठी तसेच घरापासून स्मशानभूमीपर्यंत पार्थिव पोहोचविण्यासाठी या शववाहिकेचा उपयोग करता येणार आहे.
यावेळी गुरू चंद्रशेखर महाराज यांनी कोंडुसकर कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजातील गरजू नागरिकांना अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकार्पण सोहळ्यास लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर, चंद्रकांत कोंडुसकर, श्रीधर अळवणी, जोतीबा कळसेकर, विनायक कृष्णाचे, मारुती गुंडकल, नारायण कोंडुसकर, शिवराज कोंडुसकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शववाहिका सेवेसाठी संपर्क : चंद्रकांत कोंडुसकर – ९४८०७३१०००








