- सांस्कृतिक, क्रीडा आणि मतदान साक्षरता विभागाचे उद्घाटन
बेळगाव : शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतो. आई-वडील आणि गुरुजन हे जीवनाला योग्य दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व विचारांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे कार्य केले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत प्रत्येकाने समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन केपीसीसी दलित विभागाचे कर्नाटक राज्य सदस्य मल्लेश चौगुले यांनी केले.
विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग तसेच मतदान साक्षरता मंडळाचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक आणि पाहुणे म्हणून मल्लेश चौगुले बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्नेहा आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मल्लेश चौगुले यांच्या हस्ते सांस्कृतिक, क्रीडा आणि मतदान साक्षरता विभागाचे उद्घाटन झाले. त्यानंतर नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना श्री. लग्नेश खोत यांनी कर्तव्याची शपथ दिली.
केपीसीसी दलित विभागाच्या कर्नाटक राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मल्लेश चौगुले यांचा संस्था व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी भरमू तळवार याने आयटीबीपी (ITBP) दलातील कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
विश्वभारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या ममता पवार यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य आणि शैक्षणिक प्रगतीचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात विश्वभारत सेवा समितीचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. एफ. कटांबळे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला दलित संघर्ष समितीचे बेळगाव अध्यक्ष महांतेश तळवार, संस्थेचे संचालक व सदस्य विजय साखळकर, महाविद्यालयातील शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुर नागेनहट्टी यांनी केले, तर प्रा. धनश्री गाडे यांनी आभार मानले.







