• लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

बेळगाव : गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बेळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेशमूर्तींचे आगमन, मिरवणुका तसेच विसर्जनाच्या मार्गांवर नागरिक, भाविक आणि गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांची स्थिती आणि उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावून, त्यामध्ये खड्डे, मिरवणूक मार्ग, विसर्जन मार्ग, विद्युत व्यवस्था, पथदिवे, स्वच्छता आणि विसर्जन घाटांवरील सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविताना पारंपरिक पद्धतींबरोबरच प्री-कास्ट तसेच जिओ-पॉलिमर टेक्नो-पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना द्यावेत. शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच गणेश विसर्जनाच्या मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजविण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री आदेश न काढता महानगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करावी, अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणूक आणि विसर्जनाचे मार्ग अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे संबंधित मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून ते पूर्णपणे खड्डेमुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. विसर्जन घाटांवरील आवश्यक सोयी-सुविधांची तपासणी करून त्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी व पथके नियुक्त करून २४ तास कार्यरत यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. खड्डा बुजवण्यापूर्वी आणि बुजवल्यानंतरचे छायाचित्र प्रसिद्ध करून कामात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

गणेश मिरवणुकीच्या मार्गावरील विद्युत तारांची विशेष तपासणी करून त्या सुरक्षित उंचीवर आहेत की नाही, याची खात्री करावी. विसर्जन मिरवणुकीदरम्यान विद्युत तारांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अखत्यारीबाहेरील रस्त्यांवरील खड्ड्यांचाही प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित विकास प्राधिकरणे आणि इतर शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती करावी. एखादा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत असेल आणि संबंधित यंत्रणेकडून वेळेत दुरुस्ती होत नसेल, तर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणूक मार्गांवर नवीन खड्डे किंवा चर खोदण्यास कोणत्याही यंत्रणेला परवानगी देऊ नये. तसेच मंडळांना आवश्यक परवानग्या देण्याची प्रक्रिया सुलभ व जलद ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, सुनील जाधव, अर्जुन राजपूत, गजानन हांगीरगेकर रवी कलघटगी यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.