बेळगाव : चव्हाट गल्ली येथे गेल्या अडीचशे वर्षांपासून चालत आलेली श्रावण सोमवारची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने जपली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही चव्हाट गल्लीतील नागरिकांनी आपल्या पूर्वजांनी जपलेल्या हिंदू धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचा वारसा कायम ठेवला आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनच गल्लीतील देवस्थान मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा व धार्मिक विधी* सुरू केले जातात. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गल्लीतील देव दादा मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या मूर्तीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर भक्तिभावाने *महाप्रसाद तयार करून त्याचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले.

पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर गल्लीतील भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी *माजी आमदार अनिल बेनके यांनी चव्हाट गल्लीतील या अडीचशे वर्षांच्या परंपरेचे कौतुक केले. ते म्हणाले की, आज आपण आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात प्रवेश केला असला, तरी चव्हाट गल्लीतील नागरिकांनी आपल्या पूर्वजांनी जपलेल्या हिंदू धार्मिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा वारसा आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेला आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

चव्हाट गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, भाविक, महिला व युवकांच्या सहभागामुळे हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. *परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा आदर्श चव्हाट गल्लीतील नागरिकांनी निर्माण केला आहे.