- सात शेळ्यांसह चोरीसाठी वापरलेली कार आणि दुचाकी जप्त
बेळगाव : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शेळ्या चोरीच्या प्रकरणांचा छडा लावत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून १.५० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या सात शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लक्ष्मण कणबर्गी (वय ३०, रा. अंकलगी, ता. गोकाक) आणि सिद्धप्पा नायक (वय २७, रा. बन्नीबागी, ता. हुक्केरी) अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेली मारुती सुझुकी ८०० कार तसेच दिवसा परिसराची पाहणी करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होसूर, हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुनवाडा आणि अंकलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदरगी येथे शेळ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा तपास सुरू असताना पोलिसांना संशयास्पद वाहनाची माहिती मिळाली.
वाहन तपासणीदरम्यान संशयास्पद कार थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही आरोपींचा चोरीच्या घटनांशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या शेळ्या चोरीच्या घटनांचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली बी. के. पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.








