• समस्त मराठा समाज बेळगावची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, तसेच मृत दाम्पत्याच्या अनाथ मुलांना शासकीय मदत व संरक्षण मिळावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मूळ रहिवासी असलेले मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) हे उपजीविकेसाठी सांगलीतील कुपवाड येथे वास्तव्यास होते. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने चाकू आणि हातोड्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची दोन मुले मनाली आणि मनोज यांच्यावर पालकांचे छत्र हरपले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

केसरेकर दाम्पत्याच्या मुलांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, त्यांचे पालकत्व स्वीकारून प्रत्येक मुलाला दरमहा १० हजार रुपयांची मदत सुरू करावी, तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेत संधी देण्याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

याशिवाय मुख्य फिर्यादी मनाली, तिचा भाऊ मनोज आणि इतर प्रमुख साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. आरोपीविरुद्धचा तपास वेगाने पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी रमाकांत दादा कोंडुसकर, प्राचार्य आनंद आपटेकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, मुकेश बारदेश, नंदू इंदलकर, गणेश कदम, कपिल भोसले, विनोद बिर्जे, निलेश मुदगेकर आणि विराज मोरकुंबे यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.