- बेळगावातील म्होरक्यासह तिघे ताब्यात
- १.१३ कोटीच्या ड्रग्जसह यंत्रसामग्री जप्त
तुडये : हाजगोळी (ता. चंदगड) येथील पोल्ट्री शेडमध्ये उघडकीस आलेल्या कथित ड्रग्ज निर्मिती प्रकरणात बेळगावातील व्यक्तीचा सहभाग समोर आल्यानंतर बेळगाव सीआयडीच्या पथकाने रविवारी (दि. २३) हाजगोळी येथील संबंधित पोल्ट्री फार्मची पाहणी केली.
पुणे येथील अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सने केलेल्या कारवाईत पोल्ट्री शेडमधून २०८ ग्रॅम तयार एमडी ड्रग्ज, विविध रसायने आणि ड्रग्ज निर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणे असा एकूण १ कोटी १३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर गांधीनगर, बेळगाव येथील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी मदत केल्याचा संशय असलेल्या तुडये (ता. चंदगड) येथील एका व्यक्तीसह हाजगोळीतील पोल्ट्री फार्मचा मालक पप्पू मलतवाडकर (रा. सरोळी, ता. चंदगड) यांनाही अधिक चौकशीसाठी पुणे येथील अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या मुख्यालयात नेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, बेळगाव सीआयडीच्या पथकाने अधिकाऱ्यांसह पोल्ट्री फार्मची पाहणी करत या प्रकरणाचे धागेदोरे बेळगावशी संबंधित आहेत का, याबाबत माहिती घेतली. पथकाने साध्या वेशात खासगी वाहनातून घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोल्ट्रीचालकाच्या कुटुंबीयांकडूनही संबंधित माहिती जाणून घेण्यात आली.
पोल्ट्री शेडमधून तयार एमडी ड्रग्जसह कच्चे रसायन, केमिकल पावडर, सुमारे ७० लिटर मोनोमिथाईल अमाईन केमिकल, फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनता मापक, टेस्ट ट्यूब, काचेचे प्रयोगशाळेतील जार, इंडिकेटर पेपर, हातमोजे, स्पीड कंट्रोलर, रेग्युलेटर, ओव्हन, टेस्टर, ग्रिलर, मिक्सिंग मोटार व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ड्रग्ज निर्मितीच्या या प्रकरणात बेळगावातील म्होरक्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याने सीआयडीकडून बेळगाव कनेक्शनचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील अन्य संशयितांचीही चौकशी सुरू असून, तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.








