- रास्त भाव दुकानदारांचा आंदोलनाचा इशारा
- जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला निवेदन
बेळगाव : रेशन धान्य वितरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व्हरमधील वारंवार बिघाडामुळे बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. धान्य वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याने दुकानदारांसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन सर्व्हर सुरळीत करावा, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा सरकारी रास्त भाव दुकानदार संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री आणि अन्नमंत्र्यांना निवेदन सादर केले.
जिल्ह्यात रेशन धान्याची उचल उशिराने सुरू झाली असतानाच सर्व्हरच्या तांत्रिक समस्येने वितरण प्रक्रियेत आणखी अडथळे निर्माण केले आहेत. गुरुवारी सर्व्हर पूर्णपणे बंद पडल्याने धान्य वितरण ठप्प झाले होते. दररोज उद्भवणाऱ्या या तांत्रिक अडचणींमुळे दुकानदारांना नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी निवेदनात नमूद केले.
अन्नमंत्री रिझवान अर्शद यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या दोन महिन्यांत अशा समस्या निर्माण होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजातील मंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या स्तरावर अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही षड्यंत्र रचले जात आहे का, याचीही चौकशी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यभरातील रास्त भाव दुकानदारांना भेडसावणारी ही समस्या युद्धपातळीवर सोडवून रेशन वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सर्व्हरचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला. यावेळी रास्त भाव दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी व दुकानदार उपस्थित होते.







