• आझम नगर ते शाहूनगरदरम्यान २.५ किलोमीटर रस्त्याचे होणार डांबरीकरण
  • हजारो नागरिकांना मिळणार दिलासा

बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्ते पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आझम नगर ते शाहूनगर या मुख्य रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री विशेष अनुदानातून ४.२ कोटी रुपये खर्च करून सुमारे २.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ आणि युवा नेते अमन सेठ यांच्या हस्ते आझम नगर येथील बसवण्णा मंदिरापासून शाहूनगरमधील मुख्य रस्त्यावरील शेवटच्या बसथांब्यापर्यंतच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

आझम नगर, विद्यागिरी आणि शाहूनगर या परिसरांना जोडणारा हा रस्ता दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, प्रवाशांची गैरसोय कमी होण्यासह रस्ते सुरक्षेतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाला नगरसेवक, बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक नेते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.