चिक्कोडी : अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेच्या हत्येत झाल्याची घटना चिक्कोडी शहराच्या बाहेरील परिसरात उघडकीस आली आहे. ऐरावती खोत (वय ४०, रा. नंदिवाडी, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरावती खोत आणि संजू नावाच्या व्यक्तीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती आहे. दरम्यान, संजू दुसऱ्या विवाहाच्या तयारीत असल्याचे ऐरावतीला समजल्यानंतर तिने त्याला विरोध केला होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याच वादातून संतापलेल्या आरोपीने ऐरावतीच्या डोक्यावर दगडाने वार करून तिचा जीव घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सर्व बाजूंची पडताळणी करण्यात येत असून, तपासाअंती हत्येचे नेमके कारण आणि संबंधित व्यक्तीची भूमिका स्पष्ट होणार आहे. या घटनेने चिक्कोडी परिसरात खळबळ उडाली आहे.








