• गटारी तुंबल्याने घरांमध्ये दूषित पाणी
  • जनजीवन विस्कळीत ; वाहतूक कोलमडली
  • सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ

बेळगाव : मागील काही दिवसांपासून हलक्या आणि मध्यम सरींची बरसात झाल्यानंतर पर्जन्यराजाने अखेर जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दिवसभर बेळगाव शहराला अक्षरशः झोडपून काढले. संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गटारी तुंबल्याने अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि शाळांच्या आवारात दूषित पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे न्यू गांधीनगर, वीरभद्रनगर, छत्रपती शिवाजी नगर, जुना पी. बी. रोड तसेच अन्य निवासी व व्यावसायिक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. छत्रपती शिवाजी नगरमधील मोठ्या ध्वजस्तंभाजवळ प्लास्टिक व कचरा अडकल्याने मुख्य गटार पूर्णपणे तुंबले. परिणामी पाण्याचा निचरा न झाल्याने पंजी बाबा दर्गा परिसरातील सखल भागातील घरांमध्ये दूषित पाणी शिरले. कॉलेज रोडवरील वनिता विद्यालय हायस्कूलच्या आवारातही ड्रेनेजचे घाण पाणी शिरल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची गैरसोय झाली.

मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून रिक्षा व अन्य वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जुन्या पी. बी. रोडवर वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. योग्य रस्ते व सुरक्षित गटार व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याची भीती स्थानिक वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन ठप्प झाले असून, नागरिक घराबाहेर पडण्यास कचरत आहेत. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांकडे जाणाऱ्या विद्यार्थी व नोकरदारांना छत्री व रेनकोटच्या आधाराने प्रवास करावा लागत आहे.

लेंडी नाल्यातील पाणी परिसरातील शेतांमध्ये पसरल्याने मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाळ्यापूर्वी गटारांची दुरुस्ती व स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार करूनही काही ठिकाणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या निर्माण होत असून प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते, अशी तीव्र नाराजीही स्थानिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या समस्येची माहिती मिळताच आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी गटारांमध्ये प्लास्टिक व कचरा टाकू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉलेज रोडवरील मुख्य ड्रेनेज लाईनमध्ये वर्षांपूर्वी उभारलेल्या उड्डाणपुलाच्या खांबामुळे पाण्याचा निचरा अडथळला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी सक्शन मशीनच्या साहाय्याने गटारातील अडथळा दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत केला.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगावकरांची अक्षरशः दैना उडाली असून, शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. येत्या काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरासमोरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची आशा व्यक्त होत असली, तरी तातडीने जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शाळांना वेळेत सुट्टी जाहीर करावी,अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.