- ब्रह्मेशानंद स्वामीजी
- बेळगावात गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्षानिमित्त ‘गुरुः साक्षात् परब्रह्म’ सोहळा उत्साहात
बेळगाव : आर्थिक सुबत्ता, उच्च शिक्षण आणि आधुनिक जीवनशैली यांच्याबरोबरच संस्कारांची शिदोरीही पुढील पिढीला देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीचे जतन आणि धार्मिक मूल्यांचे संवर्धन घराघरांत झाले, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कर्तृत्ववान आणि संस्कारसंपन्न व्यक्तिमत्त्व घडू शकते, असा विश्वास श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांनी व्यक्त केला. संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांच्या गुरुपीठारोहणाच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने रविवार, १८ ऑक्टोबर रोजी बेळगावातील मराठा मंदिर सांस्कृतिक भवन येथे ‘गुरुः साक्षात् परब्रह्म’ या भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि संस्कारांचे महत्त्व विशद केले.
भारतभूमीला साधू-संत आणि ऋषिमुनींच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. संतांनी केवळ अध्यात्माचा प्रसार केला नाही, तर समाजाला शिक्षण, स्वच्छता, समता आणि विश्वकल्याणाची शिकवणही दिली. संत गाडगेबाबांनी स्वच्छता आणि शिक्षणाबाबत समाजात जागृती घडवून आणली, तर संत ज्ञानेश्वरांनी अल्पवयातच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा व्यापक विचार मांडला. अशा संतांच्या कार्यातून समाजाला योग्य दिशा मिळत असून, त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत, असे स्वामीजींनी नमूद केले.
जीवनातील यश मोजताना केवळ पैसा, प्रतिष्ठा, महागडी वस्त्रे किंवा दागदागिने यांना महत्त्व देणे पुरेसे नाही. भारतीय संस्कृतीने दानधर्माला हाताचे खरे भूषण मानले आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी, गरजूंना मदत करण्याची वृत्ती आणि धर्मविचारांचे आचरण हीच व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने दैनंदिन जीवनात धर्मग्रंथांतील विचारांना स्थान द्यावे आणि मुलांमध्ये लहानपणापासूनच चांगल्या संस्कारांची रुजवण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या माध्यमातून ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीच्या आधारे धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले जातात. ‘आध्यात्मिक पर्व २०५० : आत्मज्ञानातून विश्वकल्याणाकडे’ या संकल्पनेतून गुरुतत्त्वाचा महिमा जनमानसात रुजविणे, भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणे आणि समाजात आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार करणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता. याप्रसंगी तपोभूमी दिनदर्शिका २०२७ च्या कर्नाटक आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, बेळगावच्या महापौर प्रीती विनायक कामकर, सत्गुरु फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. ब्राह्मीदेवीजी, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, उद्योजक विनय बाळीकाई, सामाजिक कार्यकर्ते धनंजय जाधव आणि श्री दत्त पद्मनाभ पीठ संत समाज संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या आध्यात्मिक सोहळ्यासाठी बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडी यांसह गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागांतून शिष्य, भक्तगण, धर्मप्रेमी नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गावस यांनी केले.








